यंदा दसऱ्याला सोनं 1 लाख 21 हजारांवर……..!!!
सोने खरेदीसाठी दसऱ्याचा दिवस चांगला मुहूर्त समजला जात असल्याने अनेक ग्राहक आपापल्या बजेट प्रमाणे सोने खरेदी करत असल्याचं दिसून येत आहे .
विजयादशमी (दसरा) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो, आणि यावेळी गाडी, घर, तसेच सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे गाडी शोरूम्स, रिअल इस्टेट प्रकल्प आणि सोन्याच्या दुकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदा सोन्याच्या किमतींनी लाखांचा टप्पा गाठलेला असतानाही, ग्राहकांनी सोनं खरेदी करण्यासाठी दुकांमध्ये गर्दी केली आहे. त्यामुळे, “आज सोन्याचे दर काय आहेत?”, “सोनं आणखी महाग झालंय का?” अशी उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर, एबीपी माझाने पुण्यातील सराफा बाजारात जाऊन सोन्याचे प्रति तोळा दर जाणून घेतले आणि यावर्षीच्या सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीची तुलना गेल्या वर्षीच्या किमतीशी केली.
विजयादशमीला सोनं खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर प्रचंड वाढले आहेत. मागील 8 दिवसांत सोन्याच्या किमतीत 10 ते 12 हजार रुपयांची वाढ झाली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये सुरु असलेली राजकीय अस्थिरता, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय आणि जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे सोनं आणि चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सणासुदीला सुरुवात होताच सोनं खरेदीला गती मिळते, आणि त्यासोबतच सोनं आणि चांदीच्या किमतीत वाढ झाल्याचं दिसत आहे.
सोन्याच्या दरातील ही वाढ ग्राहकांसाठी काहीशी अडचणीची ठरत आहे, कारण त्यातला खर्च आता अधिक झाला आहे. तरीदेखील, ग्राहक शुभ मुहूर्त साधून सणाच्या वेळी सोनं खरेदी करण्यासाठी दुकानात येत आहेत. विक्रेत्यांना विश्वास आहे की, साडेतीन मुहूर्तांपैकी उद्याचा मुहूर्त चांगला असल्यामुळे, सोनं खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल. फतेचंद रांका सराफ यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर प्रति तोळा (10 ग्रॅम) 1 लाख 21 हजार रुपये आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 44 हजार रुपये जास्त आहे.
आजचे सोनं-चांदीचे दर (Gold and Silver Rates Today):
-
सोने: 1 लाख 21 हजार (10 ग्रॅम)
-
चांदी: 1 लाख 51 हजार (1 किलो)
2024 मध्ये विजयादशमीला सोन्या-चांदीचे दर (Gold and Silver Rates on Vijayadashami 2024):
-
सोने: 76 हजार (10 ग्रॅम)
-
चांदी: 93 हजार (1 किलो)