Maratha Reservation | मराठा आरक्षणासाठी नव्या मागण्या, OBC नेत्यांना आव्हान, शेतकऱ्यांसाठी आंदोलन
मराठा आरक्षणावर तोफ – दिवाळीपर्यंत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली आहे. यावेळी अनेक महत्त्वाच्या मागण्या समोर ठेवण्यात आल्या, ज्यामध्ये 1994 चा शासन निर्णय (जीआर) रद्द करणे, 50 टक्क्यांवरील आरक्षण मर्यादा रद्द करणे, तसेच आरक्षणात समाविष्ट झालेल्या ‘बोगस’ व ‘प्रगत’ जातींची तत्काळ छाननी करून त्यांना वगळण्याची मागणी करण्यात आली.
कुणबी प्रमाणपत्रांसाठी 58 लाख नोंदींच्या आधारे प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याची मागणी करत, प्रलंबित खटले मागे घेण्याचेही आवाहन करण्यात आले. शहीद कुटुंबांना मदत व नोकरी मिळावी, तसेच सातारा, औंध, पुणे, कोल्हापूर गॅझेटियरच्या प्रक्रियेला वेग द्यावा, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
शिंदे समितीचे काम पुन्हा सुरू करून हैदराबाद जीआरनुसार अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, असेही आंदोलकांनी स्पष्ट केले.
यावेळी ओबीसी विरुद्ध मराठा असा कोणताही वाद नसल्याचे अधोरेखित करत, काही नेते राजकीय स्वार्थासाठी समाजात फूट पाडत असल्याचा आरोपही करण्यात आला. “माया नादी लागू नको” अशा शब्दांत थेट इशारा देण्यात आला.
दरम्यान, जर दिवाळीपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर शेतकऱ्यांसाठी मोठ्या आंदोलनाची तयारी असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये कर्जमुक्ती, 100 टक्के नुकसानभरपाई, पीक विमा, शेतकऱ्यांना नोकरीचा दर्जा व पेन्शन या प्रमुख मागण्या असतील, अशी माहिती देण्यात आली.