हैदराबाद गझेटवरील जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होणार नाही – बबनराव तायवाडे यांची स्पष्ट भूमिका
मुंबई : हैदराबाद गझेटसंदर्भातील शासकीय निर्णयावरून सुरू असलेल्या वादात ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या जीआरमुळे ओबीसी समाजाचं कोणतंही नुकसान होणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.
“जीआर असो वा नसो, ओबीसी आरक्षणावर त्याचा परिणाम होणार नाही,” असं तायवाडे म्हणाले. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, असं त्यांना वाटत नाही. “कायदा हा जीआरपेक्षा मोठा असतो. कायद्याच्या तरतुदींनुसारच सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक मराठा व्यक्तीला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, अशी कोणतीही तरतूद या जीआरमध्ये नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
तायवाडे यांनी आजच्या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. “सरकारने स्वतंत्र बैठक बोलावली, तरच आम्ही सहभागी होऊ,” असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या भूमिकेला ओबीसी समाजातून विरोध होत असल्याने त्यांनी बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
“उद्या हा जीआर कायम राहिला, तरी ओबीसी आरक्षणाला धोका नाही. आणि रद्द केला, तरीही नुकसान नाही. त्यामुळे सरकारने काय करावं, याबद्दल आम्हाला काही घेणंदेणं नाही,” असं तायवाडे यांनी स्पष्ट करत, ओबीसी समाजाच्या हितासाठी आपण ठाम आहोत, हे पुन्हा अधोरेखित केलं.